इंद्रधनुष्य उलगडताना

#अनुवाद

इंद्रधनुष्य उलगडताना:

            इंग्रजी कवी केट्स याने आपल्या  'लॅमिया' या प्रसिद्ध कवितेमध्ये शात्रज्ञांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे."शास्त्रज्ञांनी इंद्रधनुष्य कसे तयार होते हे सांगून त्यातील सौंदर्यच घालवून टाकले आहे" असा शोक त्याने व्यक्त केला आहे. पण ज्या विज्ञानाने इंद्रधनुष्य उलगडून दाखविले, त्यानेच जीवनातील रहस्य आणि विश्वाची उत्पत्ती या गोष्टीही स्पष्ट केल्या आहेत.

न्यूटन आणि लोलक
            'प्रकाश हा सप्तरंगांचा बनलेला असतो' या न्यूटनने लावलेल्या शोधाबद्दल कवी केट्स नाराज आहे. शाळेत असल्यापासूनच आपल्याला न्यूटन च्या या शोधाबद्दल माहिती आहे, ज्यात त्याने स्वतःला एका बंदीस्त खोलीत बंद करून घेतलं आणि फक्त काही प्रकाशाचे किरणच आत प्रवेश करू शकतील अशी व्यवस्था केली. त्याने या प्रकाश किरणांच्या वाटेत लोलक ठेवून त्यांचे सात वेगवेगळ्या रंगांच्या किरणांमध्ये विभाजन केले. अशाप्रकारे त्याने इंद्रधनुष्याच्या सात रंगांचे रहस्य उलगडले. त्याच्या या शोधातूनच पुढे वर्णपंक्ती विज्ञानाचा जन्म झाला.
          
तुम्ही स्वतःही वर्णपंक्तीदर्शन करू शकता. यासाठी एक छायाचित्रक आणि लोलक लागेल. एक प्रतिदिप्त दिवा कागदाने पूर्ण लपेटून घ्या आणि त्यातून फक्त काहीच किरण बाहेर पडतील एवढेच छिद्र पाडा. या किरणांच्या वाटेत एक लोलक ठेवा आणि पृथक्करीत झालेले किरण छायाचित्रकात शिरतील असे बघा. आता तुम्हाला कोणकोणते रंग दिसतात? आता जरा वेगळ्या रंगाचा दिवा वापरून हाच प्रयोग करा. किंवा रंगीत पारदर्शक कागदाचे तूकडे (उदा. लाल, पिवळा, हिरवा इत्यादी) त्या दिव्याच्या आणि लोलकाच्या मध्ये ठेवा. आता छायाचित्रक काय दर्शवितो?
        
रसायनशास्त्रज्ञ वर्णपंक्तीविज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. प्रत्येक मूलद्रव्य तापविल्यावर एका ठराविक रंगाचा प्रकाश उत्सर्जित करतात, हे सर्वज्ञात आहेच.(याला त्या मूलद्रव्याचा विशिष्ठ गुणधर्म म्हणतात.) उदा. जेव्हा मीठ ज्योतिवर तापविले जाते, तेव्हा आपल्याला गडद पिवळा रंग उत्सर्जित होताना दिसतो.( हेच सोडीयमच्या वाफेच्या दिव्यामागील तत्व आहे) मीठा मध्ये असलेल्या पोटॅशियम आयोडाईड मुळे या पिवळ्या रंगाच्या ज्योतिमध्ये फिक्कट जांभळा  रंग हि दिसतो.
        
रसायनशास्त्रज्ञ एखाद्या अनोळखी पदार्थामधील मूलद्रव्ये शोधून काढण्यासाठी वर्णपंक्तीशास्त्राचा वापर करतात. हेलियम चा शोधही असाच लागला.
         
१८ ऑगस्ट १८६८ या दिवशी भारतातील गुंटूर येथे, फ्रेंच खगोलशास्त्रजज्ञ पियर जॅनसन ग्रहण काळात वर्णपटदर्शकातून सूर्याकडे पाहत होता. त्याला वर्णपटलेखात एक गडद पिवळी रेश दिसली, जी त्याला यापूर्वी कधीही दिसली नव्हती. त्याला वाटलं की तो सोडियम आहे. पण नंतर विश्लेशणानंतर, ते एक नवीन मूलद्रव्य असल्याचा शोध लागला. ग्रीकमधे सूर्याला Helios म्हणतात. सुर्यात सापडलेले मूलद्रव्य म्हणून त्याला हेलियम हे नाव पडले. आणि हे अगदी सार्थ आहे कारण सूर्याचा जवळ जवळ पाव भाग हा हेलियम ने बनलेला आहे.
         
अशाच प्रकारे शोध लागलेले दुसरे मूलद्रव्य म्हणजे इंडियम. १८६३ मध्ये जर्मन रसायनशास्त्रज्ञ राइश आणि रिष्टर काही मूलद्रव्यांच्या रचनेचे पंक्तीमिती द्वारे विश्लेषण करत होते. त्यांना वर्णपटलेखात नीळसर रंग दिसला. तो एका नवीन मूलद्रव्याचा विशिष्ठ गुणधर्म सिद्ध झाला. या मूलद्रव्याला त्यांनी इंडियम असे नाव दिले.(याचा india शी काहीही संबंध नाही.)

वर्णपटविज्ञान आणि विश्वाचे रहस्य
           २०१० साली human genome project पूर्ण होऊन १० वर्षे  झाली. यात बुद्धिमानवाच्या संपूर्ण जनुकाची रचना अभ्यासली गेली. हे सर्व  ' डी एन ए क्रमीकता' यामुळे शक्य झाले आणि यात वर्णपटविज्ञानाचा मोठा वाटा आहे.
         
तुम्हाला माहीतच आहे की डीएनए हा चार मुख्य घटकांपासून बनलेला आहे. ग्वानिन(G), सायटोसिन (C), थायमीन(T) आणि ऍडेनिन(A). डीएनए क्रमीकतेमध्ये यापैकी प्रत्येक घटकाची एका प्रतिदिप्त संयुगाबरोबर क्रिया घडवून आणली जाते. अशाप्रकारे प्रत्येक घटक त्याचा असा एक खास विशिष्ठ रंग धारण करतो. ग्वानीन हे नेहमी पिवळ्या, सायटोसिन निळ्या, थायमीन लाल आणि ऍडेनोसीन हिरव्या रंगाचे दिसते. डीएनए हा क्रमद यंत्राने वाचला जातो.यात वर्णपटात आपल्याला रंगीत पट्ट्यांची साखळीच दिसते. यावरून आपल्याला डीएनए चा क्रम समजतो. अशाप्रकारे अमेरिका, जपान, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, चीन, भारत, कॅनडा आणि न्यूझीलंड येथील शेकडो शात्रज्ञानी दहा वर्षांत 3 अब्ज घटकांनी बनलेल्या मानवी जनूकाला उलगडून दाखविले.

वर्णपटविज्ञान आणि विश्वाचा जन्म
           खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल(१८८९-१९५३) याला आतिदूरवरून आकाशगंगा न्याहाळण्यात रुची होती. त्याला माहित होते की आकाशगंगा या आपणहून दूर जात असतील तर त्या वर्णपटात अधिकतर लाल रंग दर्शवतील आणि जवळ येत असतील तर अधिकतर निळा रंग दर्शवतील. त्याने असे दाखवून दिले की आकाशगंगा जेवढी लांब असेल त्या प्रमाणात वर्णपटात ती लाल दिसेल.
        
याचा अर्थ असा की आपल्यापासून लांब असलेल्या आकाशगंगा या अजून लांब जात होत्या. म्हणजेच भूतकाळात त्या जवळ असल्या पाहिजेत. जर तुम्ही भूतकाळात अगदी मागे गेलात तर अशा एका काळात पोहोचाल कि जेव्हा या आकाशगंगा  अगदी एकमेकात मिसळून गेल्या होत्या. अजून  मागे गेलो(१३.९ अब्ज वर्ष मागे) तर  सर्व गोष्टी एवढ्या जवळ होत्या की सर्व काही एका बिंदूत सामावू शकेल. आणि हाच तो क्षण कि जेव्हा विश्वाची उत्पत्ती झाली. शास्त्रज्ञांनी त्याला "बिग बँग" असे नाव दिले.

          आता यापुढे तुम्हाला जेव्हाजेव्हा इंद्रधनुष्य दिसेल तेव्हातेव्हा हे विश्व, त्यावरील जीवन आणि सर्वकाही आठवेल.

अनुवाद:-प्रियांका कुंटे

#ज्ञानभाषामराठीहीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

Comments

Popular Posts