तांत्रिक किंवा कार्योपयोगी वस्त्रे- ३

तांत्रिक वस्त्रांसाठी तंतू, सूत व कापड या तिन्हींचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे २१ टक्के तांत्रिक वस्त्रे ही थेट तंतूंपासून बनविली जातात, ९ टक्के तांत्रिक वस्त्रे ही सुताच्या स्वरूपात असतात, तर ६७ टक्के तांत्रिक वस्त्रे ही कापडाच्या स्वरूपात बनविली जातात. कापड हे विणाई, गुंफाई, विनावीण या प्रमुख पद्धतींबरोबरच इतर काही पद्धतींनीही बनविले जाते. तांत्रिक वस्त्रांमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या कापडांमध्ये सर्वात मोठा हिस्सा विणाई पद्धतीने बनविलेल्या कापडाचा असून तो सुमारे ७३ टक्के इतका आहे, त्यानंतर विनावीण पद्धतीने बनविलेल्या कापडाचा क्रमांक येतो व त्यांचा हिस्सा २० टक्के इतका आहे, तर गुंफाई पद्धतीने बनविलेल्या कापडाचा हिस्सा ५ टक्के इतका आहे.
तांत्रिक वस्त्रांच्या क्षेत्रामध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या तंतूंचे प्रमाण खाली दिल्याप्रमाणे असते-
कापूस- ७ टक्के, काथ्या- १४ टक्के, व्हिस्कोज- ३ टक्के, इतर सेल्युलोज पुनर्जनित तंतू- ३ टक्के, पॉलिस्टर- २५ टक्के, पॉलिअमाइड- ७ टक्के, पॉलिइथिलिन/ पॉलिप्रॉपिलिन- २५ टक्के. यावरून आपल्या असे लक्षात येईल की, तांत्रिक वस्त्रांच्या निर्मितीमध्ये नसíगक तंतूंपेक्षा मानवनिर्मित तंतूंचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. तांत्रिक वस्त्रांसाठी तन्यता, स्थितिस्थापकत्व, लंबनक्षमता यांसारखे गुणधर्म जास्त महत्त्वाचे असतात आणि हे गुणधर्म विशेषकरून संश्लेषित तंतूंमध्ये अधिक प्रमाणात असतात, त्यामुळे तांत्रिक वस्त्रांच्या निर्मितीत संश्लेषित तंतूंचा वापर अधिक प्रमाणात केला जातो.
जगामध्ये तांत्रिक वस्त्रांचा सर्वात जास्त वापर अमेरिकेमध्ये होतो. तेथे जगातील तांत्रिक वस्त्रांच्या एकूण खपापकी २३ टक्के खप होतो. त्यानंतर पश्चिम युरोप (२२ टक्के), चीन (१३ टक्के), जपान (७ टक्के) यांचे क्रमांक येतात. भारतातील तांत्रिक वस्त्रांचा वापर जगातील एकूण वापराच्या ३ टक्के इतका आहे. भारताची लोकसंख्या लक्षात घेता हा अतिशय कमी आहे. भारतामध्ये तांत्रिक वस्त्रांच्या प्रसारास मोठा वाव आहे.
केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये तांत्रिक वस्त्रांच्या उत्पादनाच्या विकासाचा वेग अकराव्या पंचवार्षकि योजनेच्या काळात सरासरी ११ टक्के इतका होता आणि बाराव्या पंचवार्षकि योजनेच्या काळात तो सरासरी २० टक्के राहील असा अंदाज आहे. वस्त्रोद्योगाच्या तिन्ही क्षेत्रांमध्ये तांत्रिक वस्त्रांच्या विकासाची गती ही सर्वाधिक आहे.
– चं. द. काणे  (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

Comments

Popular Posts