कुतूहल : हरितगृह

बहुतेकदा ज्या शेतकऱ्यांकडे शेती क्षेत्र जास्त आहे ते शेतकरी पारंपरिकरीत्या खुल्या वातावरणातच शेती करतात; परंतु ज्यांच्याकडे कमी क्षेत्र, कमी पाण्याची व्यवस्था आणि शेतमजुरांचा अभाव आहे, बिगरमोसमी व तांत्रिक पद्धतीने ज्यांना विविध पिके (फळे, फुले, भाजीपाला) घ्यावयाची असतात, ते शेतकरी आधुनिक पद्धतीने म्हणजेच वातावरण नियंत्रित शेती करतात. याच पद्धतीस हरितगृह किंवा शेडनेटमधील शेतीपद्धत म्हटले जाते. 
हरितगृह उभारणीसाठी तांत्रिक मार्गदर्शन, लागणारे साहित्य, येणारा खर्च, शासनाचे अनुदान, पीक रचना यांची संपूर्ण माहिती, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे, कृषी विभाग यांच्यामार्फत प्रशिक्षणाद्वारे व प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर देण्यात येते. महाराष्ट्रामध्ये अवर्षण परिस्थिती लक्षात घेऊन व पाण्याची टंचाई गृहीत धरून बीड, जालना, औरंगाबाद, यवतमाळ, अकोला, अमरावती, अहमदनगर, सोलापूर, सांगली, पुणे, जळगाव, धुळे, सातारा इत्यादी जिल्ह्यांमध्ये शेतकरी हरितगृहातील भाजीपाला पिके (ढोबळी मिरची, रंगीत ढोबळी मिरची, काकडी, फुलकोबी, साधी मिरची, कलकत्ता पानवेल) तसेच फुलझाडे (कान्रेशन, जरबेरा, गुलाब, मोगरा, लिली इत्यादी फूलपिके) घेऊन अपेक्षित उत्पादन मिळवीत आहेत.
शेडनेट किंवा हरितगृह शेती ही नियंत्रित शेती आहे. म्हणजेच विविध पिकांचे प्रखर सूर्यकिरणांपासून रक्षण, सोसाटय़ाचा वारा, पाऊस, गारपीट यांपासून संरक्षण, कार्बन डायॉक्साइडच्या प्रमाणात वाढ, अतिनील किरणांपासून संरक्षण, कीडरोगांपासून संरक्षण व कमी मनुष्यबळ हे तांत्रिक मुद्दे या पद्धतीमध्ये आहेत. तांत्रिक दृष्टीने हरितगृहाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे वातावरण नियंत्रित हरितगृह. या प्रकारच्या हरितगृहामध्ये तापमान व आद्र्रता सूक्ष्म सिंचन तंत्र वापरून नियंत्रित केली जाते. या हरितगृहामध्ये वायुविजनाची सोय तसेच पंखे, पडदे आवश्यक असतात. हे हरितगृह पूर्णपणे बंद असते. हे हरितगृह उच्च प्रतीच्या फुलांसाठी व ऊतीसंवर्धनासाठी वापरले जाते. दुसरा हरितगृह प्रकार म्हणजे नैसर्गिक वायुविजन हरितगृह. यात नैसर्गिक वायुविजन असते. पिकांच्या आवश्यकतेनुसार तापमान, आद्र्रता, कार्बनडायॉक्साईड वायूचे प्रमाण राखता येते. शेडनेटसाठी कमीत कमी ५०० चौरसमीटर व जास्तीत जास्त ४००० चौरस मीटर क्षेत्राची मर्यादा आहे. यासाठी योग्य निकषानुसार उभारलेल्या शेडनेट हरितगृहासाठी शासनाच्या कृषी विभागातर्फे खर्चाच्या ५० टक्के अनुदान मिळू शकते.
–  सुधीर फडके (अहमदनगर)
मराठी विज्ञान परिषद, 
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

Comments

Popular Posts