कुतूहल: दुग्ध व्यवसायातील समस्या

आजही दुग्ध व्यवसायात दुधाच्या प्रतीनुसार भाव या संकल्पनेचा वापर होत नाही. दिवसेंदिवस दुधाच्या भेसळीचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्याने दूध उत्पादित केल्यानंतर पुढील सर्व पातळ्यांवर दुधात जास्ती जास्त भेसळ होऊन शेवटी ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे दूध पोहोचते. दूध गुणप्रत नियंत्रण यंत्रणेचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. 
दुग्ध व्यवसायामध्ये चारा आणि खाद्याच्या नियोजनाचा अभाव हा सर्वात मोठा प्रश्न आहे. शेतकरी आणि शासनाला जास्त पसा देणाऱ्या या व्यवसायासाठी लागणाऱ्या चारा पिकाखाली फक्त दोन-तीन टक्केच क्षेत्र आहे. चारा पिकाला अनेक ठिकाणी पाण्याचीही उपलब्धता करून दिली जात नाही. दूध उत्पादकही वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन करत नाही. उपलब्धतेनुसार एकाच प्रकारचा चारा जनावरांना खाऊ घालतात. त्याचा परिणाम गाईंच्या आरोग्यावर तसेच दुग्ध उत्पादनावर होतो. 
ऊस कारखाना सुरू असताना जनावरांना केवळ उसाचे वाढे खाऊ घालून दुग्ध व्यवसाय केला जातो. परंतु वाढय़ामध्ये असलेल्या ऑग्झिलेटमुळे जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम कमी होऊन गाईंचे आयुष्य कमी होते. गाईंना एकदल, द्विदल आणि कोरडा चारा संतुलित प्रमाणात देण्यासाठी योग्य नियोजन होत नाही. गरजेनुसार पोषणाचा अभाव ही एक मोठी समस्या दुग्ध व्यवसायामध्ये आहे. 
नसíगक पद्धतीने जनावराचे पालन केल्यास दुग्धोत्पादन वाढते. परंतु आपल्या पारंपरिक दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांना गोठय़ामध्ये बांधून ठेवले जाते. शिवाय बंदिस्त गोठय़ात गाई जेथे चारा खातात, तेथेच त्यांचे शेण पडते. या शेणावरच त्या बसतात. त्यामुळे त्यांच्यात कासदाह या घातक आजाराचे प्रमाण वाढते. गाई आजारी पडण्याचे प्रमाण वाढून त्यांचा वैद्यकीय खर्च वाढतो. गोचिडांचे प्रमाण वाढून ताप येण्याचे प्रमाणही वाढते. 
 दुग्ध व्यवसायात सुयोग्य तंत्रज्ञान निर्मिती आणि विस्तार, चांगल्या योजना, चांगल्या गुणप्रतीची दूध निर्मिती आणि वितरण यांसारख्या उणिवा आहेत. तसेच मजुरांची उपलब्धता, चाऱ्याचा अभाव, भांडवलाची उपलब्धता, दुधाचा दर याबरोबरच समाजाचा या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन या समस्यांना तोंड देत या व्यवसायाला पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे.
– डॉ.भास्कर गायकवाड (अहमदनगर)
मराठी विज्ञान परिषद, 
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

Comments

Popular Posts