संबलपुरी साडी

कुतूहल
ओरिसा राज्यातील बारगड, सोनेपूर, संबलपूर, बोध इत्यादी जिल्ह्यांत तयार होणारी ‘संबलपुरी साडी’ इसवीसनपूर्व काळापासून ज्ञात आहे. सन १९२५ पर्यंत पश्चिम ओरिसा पुरतीच सीमित असलेली ही साडी, मर्यादित नक्षीकाम तसेच नसíगक रंग वापरूनच तयार केली जात होती. स्थानिकरित्या ‘भूूलिया कप्ता’ या नावाने ही साडी ओळखली जाते. स्वातंत्र्योत्तर काळात ‘वीव्हर्स सव्‍‌र्हिस सेंटर’ने अन्य साडय़ांप्रमाणेच या साडीच्या डिझाइनबाबतही अभ्यास केला. सन १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही साडी वापरायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्या साडीची मागणी देशभर वाढली. ही वाढीव मागणी लक्षात घेऊन संबलपुरी साडीला ‘भौगोलिक स्थान दर्शक नोंदणी प्रमाणपत्र’ मिळाले. संबलपुरी साडीमध्ये सोनेपुरी, पासापली, बोमकाई, बाटपली आणि बापटा असे प्रकार आहेत.
बोमकाई साडी मुख्यत्वे मध्यम सूतांकाच्या धाग्यांनी विणलेली असते, पण रंगसंगती मात्र आकर्षक असते. बोमकाई साडी सोनेपुरी म्हणूनही ओळखली जाते. पण सोनेपुरी साडी सुतीबरोबरच रेशीम धाग्यांनी विणली जाते. पासापल्ली साडी रेशमी असून त्याला सुंदर पदर असतो. बुद्धिबळाच्या पटासारखी चौकोनी नक्षी साडीवर केलेली असते, हे त्याचे वेगळेपण.
संबलपुरी साडीचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे या साडीचा ताणा आणि बाणा दोन्ही धागे बांधणीच्या तंत्राने ( ‘टाय अँड-डाय’ म्हणजेच धाग्याची लडी ठराविक ठिकाणी बांधून रंगाई-पद्धत) रंगवलेले असतात. बांधणी कला ही खास कला आहे. या पद्धतीने नुसत्या सूत रंगवायलाच काही आठवड्याचा कालावधी लागतो. साडीचा तजेलदारपणा सहजी दशकभर टिकून राहतो. ही या कलेची खासियत आहे. या साडीमध्ये पारंपरिकरित्या शंख, चक्र, फुल, इत्यादी नक्षीकाम विणून केले जाते. त्याचबरोबर पानाफुलांच्या नक्षीचाही समावेश असतो. तसेच नक्षीचे रूप साडीच्या दोन्ही बाजूने एकसारखेच असते, हे संबलपुरी साडीचे वैशिष्टय़ आहे. युद्धातील ठिकठिकाणच्या विजयाचे प्रसंग तसेच रासक्रीडा असे प्रसंग साडय़ांवर चितारलेले असतात. नवीन साडय़ांमध्ये वनस्पती, प्राणी, भौमितिक आकृतीबंध अशी नक्षीही समाविष्ट करण्यात आली आहे.
या साडय़ा विणणाऱ्या परंपरागत विणकरांची परिस्थिती मात्र हलाखीची आहे. ओरिसा सरकारने हस्तक्षेप करून विणकरांना दिलासा दिला आहे. त्याचबरोबर या विणकराकडून ड्रेसमटेरियल, बेडकव्हर, टॉवेल वगरे उत्पादने तयार करून घेऊन त्यांची रोजीरोटी टिकवून ठेवली आहे.
> दिलीप हेर्लेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

Comments

Popular Posts