कुतूहल : बीजप्रक्रिया

बियाण्याला एखाद्या औषधाचे किंवा जैविक खताचे वेष्टन लावणे म्हणजे बीजप्रक्रिया. या प्रक्रियेसाठी कीडनाशके व बुरशीनाशके वापरतात. त्यामुळे बियाणांची उगवणशक्ती वाढते, रोपटे जोमाने वाढून निरोगी राहते. पिकाच्या उत्पादनात १०-१५ टक्के भर पडू शकते.
कीडनाशकामुळे जमिनीत राहणाऱ्या किडी (हुमणी, मुंग्या, वाळवी इ.) आणि रोपटय़ाचा जमिनीलगतचा भाग कुरतडून नष्ट करणाऱ्या किडी (अळ्या, भुंगेरे इ.) यांच्यापासून संरक्षण मिळते. बुरशीनाशकामुळे जमिनीतील बुरशी नष्ट होते. मुळकूज, मर या प्रमुख रोगांचे नियंत्रण होते. कारण रोगांचे जीवाणू बियाण्यावर किंवा बियाण्याच्या आत सुप्तावस्थेत राहतात.
कोरडय़ा बीजप्रक्रियेसाठी बुरशीनाशकाची भुकटी बियाण्याच्या पृष्ठभागावर थोडा िडक किंवा गूळ लावून मिसळावी किंवा शक्य झाल्यास ड्रम, मडके किंवा प्लास्टिकच्या पिशवीत बियाणे आणि बुरशीनाशके एकत्र करून पिशवी हळुवार वर-खाली करावी. त्यामुळे बियाणांवर लेपन तयार होते. 
ओल्या बीजप्रक्रियेसाठी बुरशीनाशकाच्या पाण्यातील द्रावणात १०-१५ मिनिटे बियाणे बुडवावे. हे द्रावण निथळून बियाणे सावलीत सुकवावे. मोठय़ा प्रमाणात बीजप्रक्रिया करण्यासाठी स्वच्छ ड्रम किंवा मडक्यात अध्र्यापर्यंत बियाणे भरावे आणि बुरशीनाशकाचे पाण्यात घट्ट द्रावण करून ते बियाण्यांवर ओतावे व चांगले हलवावे. त्यामुळे बियाण्याच्या सर्व बाजूंनी लेपन होते. बियाण्याचे टरफल खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रक्रिया केलेले बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवावे. पेरणीनंतर उरलेले बियाणे नष्ट करावे.
जीवाणू खताच्या प्रक्रियेसाठी एक लिटर गरम पाण्यात १०० ग्रॅम िडक किंवा गूळ विरघळवून हे द्रावण १५ मिनिटे उकळावे. द्रावण थंड झाल्यावर खताची भुकटी द्रावणात टाकावी आणि ढवळावे. फरशी किंवा ताडपत्री यावर बियाणे पसरून त्यावर वरील मिश्रण िशपडून हलक्या हाताने चोळावे. हे बियाणे सावलीत वाळवून लवकरात लवकर पेरावे. जीवाणू खते लावण्यापूर्वी बियाणांस कीडनाशके, बुरशीनाशके आणि जंतुनाशके दोन-तीन दिवस अगोदर लावावीत. कोणत्याही रासायनिक खताबरोबर जीवाणू खत मिसळू नये. खताचे पाकीट कोरडय़ा व थंड ठिकाणी ठेवावे आणि ते कीडनाशके, बुरशीनाशके, खते इत्यादी रासायनिक पदार्थापासून दूर ठेवावे. पाकिटावर वापरण्याची अंतिम तारीख दिलेली असते, त्या तारखेपर्यंतच या खतांचा वापर करावा.
-डॉ. रूपराव गहूकर  (नागपूर) 
मराठी विज्ञान परिषद, 
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

Comments

Popular Posts