कुतूहल : हरितक्रांतीचे जनक : डॉ. नॉर्मन बोरलॉग

डॉ. नॉर्मन अन्रेस्ट बोरलॉग. सारं जग त्यांना प्रेमाने ‘प्रोफेसर व्हीट’ (म्हणजे ‘प्राध्यापक गहू’ – गव्हाचार्य! ) म्हणायचे. बोरलॉगनी मेक्सिकोमध्ये आपल्या सहकाऱ्यांसमवेत तब्बल सोळा वष्रे गहू आणि त्यांच्या संकरित जातींचा विकास यावर संशोधन केलं.
१९४२ साली मिनिसोटा विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवल्यावर नॉर्मन बोरलॉग यांनी दोन वष्रे वेिलग्टन इथे जीवाणूनाशकं आणि कवकनाशकांचा शेतीसाठी उपयोग करण्याच्या दृष्टीने संशोधन केलं. त्यानंतर मेक्सिकोत गव्हाचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वेगवेगळ्या वातावरणात उगवू शकतील, ज्यांची रोपे लहान असतील; मात्र या रोपातील लोंब्या आणि त्यातले दाणे जास्त असतील, तसंच रोगप्रतिकारक असतील अशा गव्हाच्या जातींची निर्मिती त्यांना करायची होती. प्रयोग करण्यासाठी त्यांनी एकमेकांपासून एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेली आणि दोन्ही ठिकाणची उंची, मातीची संरचना, तापमान आणि प्रकाश इत्यादी बाबींच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी असतील अशी मेक्सिकोमधली दोन ठिकाणं निवडली. या दोन्ही ठिकाणी त्यांनी सातत्याने दहा वष्रे गव्हावरील संकरणाचे प्रयोग केले. या प्रयोगांच्या आधारे त्यांनी गव्हाच्या काही संकरित जाती निर्माण केल्या. उदाहरणार्थ, ओरविले योगेल यांनी निर्माण केलेल्या नौरिक-१० या जपानी जातीचा संकर जास्त उत्पादन देणाऱ्या ब्रेबर-१४ या अमेरिकन गव्हाच्या जातीशी करण्यात आला. अशा प्रयोगांमुळे मेक्सिकोतल्या कृषी उत्पादनाचं स्वरूपच बदललं. गव्हाच्या उत्पादनाच्या बाबतीत मेक्सिको स्वयंपूर्ण तर झालाच, पण गव्हाची निर्यातही करू लागला.
१९६०च्या दशकात आपला देश अन्न समस्येशी झुंजत होता. काही भागात तर भीषण दुष्काळाची स्थिती होती. भारताच्या कृषिमंत्रालयाचे तत्कालीन सल्लागार डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी नॉर्मन बोरलॉगना भारतात बोलावलं. बोरलॉग यांच्या सहकार्याने १९६६ साली अधिक उत्पन्न देणारी सुमारे अठराशे टन बियाणं मेक्सिकोतल्या मका व गहू विकास केंद्रातून आयात करण्यात आली. या बियाणांचा वापर केल्याने आपल्या देशात गव्हाच्या उत्पादनात साधारणत: दुपटीने वाढ झाली. १.२३ कोटी टनांवरून हे उत्पादन २.१ कोटी टनांपर्यंत वाढले. भारतात ‘हरितक्रांती’ झाली आणि १९७४ सालापर्यंत धान्य उत्पादनात आपण स्वयंपूर्ण झालो.
– हेमंत लागवणकर    
मराठी विज्ञान परिषद, 
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

Comments

Popular Posts