टायरन जांभळा : रंग राजांचा

#अनुवाद

टायरन जांभळा : रंग राजांचा

रंग कोणताही असो ,आज सर्व रंगांच्या कपड्यांच्या किमती जवळपास सारख्याच आहेत .पण तुम्हाला माहित आहे काय की काही पिढ्यांपूर्वी ही किंमत कापडाच्या रंगावर अवलंबून होती ?याचे कारण असे होते की कपड्यांचे रंग तयार करणे अत्यंत खर्चिक होते . टायरन जांभळा हा रंग तर इतका महाग होता की तो फक्त राजा महाराजांनाच  परवडत असे.

जांभळ्या रंगात जन्म” (Born In Purple)

टायरन जांभळा (किंवा राजेशाही जांभळा Royal Purple) या रंगद्रव्याने कपड्याला जांभळ्या रंगाची छटा प्राप्त होते .प्राचीन काळी हा रंग भूमध्य समुद्रातील सागरी गोगलगायींपासून (शास्त्रीय नाव म्युरेक्स ब्रँडेरीस Murex Branderis) तयार केला जात असे .टायरन जांभळा हे  रंगद्र्व्य तयार करणे आणि त्याचा व्यापार या विषयीच्या नोंदी इसवि सन पूर्व चौथ्या शतकापासून आढळतात .हे रंगद्रव्य कसे तयार केले जात असे याविषयीचा  वर्णन  वृत्तांत  प्लिनी द एल्डर या प्रसिध्द रोमन इतिहासकार आणि शास्त्रज्ञाने आपल्यासाठी मागे ठेवला  आहे .

समुद्रातून प्रथम गोगलगाई पकडल्या जातात आणि त्यांच्या रंगद्रव्य धारक वाहिन्या अलग करून त्या कुस्करल्या जातात .अशा प्रत्येक १०० पौंड रसामध्ये २० औंस मीठ घातले जाते आणि  हे मिश्रण तीन दिवस तसेच  ठेवले जाते. यानंतर हे मिश्रण  रंगद्रव्य आटवण्यासाठी  जस्त किंवा शिशाच्या भांड्यात दहा दिवसापर्यंत मंदपणे उकळत ठेवले  जाते . यानंतर रंग द्यायचे वस्त्र या उकळत्या मिश्रणात बुडविले जाते .बुडविलेल्या वस्त्राला मनपसंत छटा येईपर्यंत ही मिश्रणात उकळण्याची क्रिया सुरु ठेवली जाते .काळपट छटांपेक्षा लालसर छटा या कमी दर्जाच्या समजल्या जातात .सरते शेवटी वस्त्राला पूर्णपणे रंग चढेपर्यंत वस्त्र या मिश्रणात भिजत ठेवले जाते .

हे सगळं प्रकरण  खूप किचकट वाटतंय ना ?

रंगद्र्व्याचे समान वजनाच्या चांदीएवढे मूल्य

असं म्हटलं जातं की य १.४ ग्रॅम वजनाचे रंगद्रव्य तयार करण्यासाठी १२००० गोगल गायींचा वापर करावा लागत असे .याच कारणाने हे रंगद्रव्य इतके महागडे होते की इतिहासकार थिओपॉम्पस  याने असे नमूद करून ठवले आहे की “या जांभळ्या रंगद्रव्याचे बाजारी मूल्य समान वजनाच्या चांदी इतके मिळत असे “असे असूनही एक प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून लोकांना याचे  एक वेडच होते  .बिझँटियमच्या  (Byzantium) सम्राटानी तर  त्यांच्याशिवाय इतरांना या रंगद्रव्याची वस्त्रे वापरण्यास मज्जाव करणारा कायदाच केला .अशा प्रकारच्या प्रथांमधूनच “ जांभळ्यामध्ये जन्म “ (Born In Purple) या वाक्प्रचाराचा जन्म झाला . या चित्रामध्ये तुम्ही सम्राट जस्टीनियन I याने टायरन जांभळा या रंगामध्ये धारण केलेला पेहेराव पाहू शकता .गंमत म्हणजे सूर्यप्रकाशात फिक्या पडत जाणाऱ्या इतर रंगांच्या उलट   टायरन जांभळा रंग  हा  सूर्यप्रकाशात अधिकच  गडद होतो .

रंगद्रव्ये : प्राचीन आणि आधुनिक

आधुनिक काळापर्यंत सर्व रंगद्रव्ये एकाच पद्धतीने तयार केली जात असत .उदाहरणार्थ कोचीनेल हे जांभळा(crimson)  रंग देणारे   रंगद्रव्य कर्मीस व्हरमीलिओ  (kermes vermilio) या खवले असणाऱ्या कीटकापासून तयार केले  जात असे .एक पौंड रंगद्रव्य तयार करण्यासाठी ७०००० कीटकांची शरीरे उकळली जात नंतर त्यांची पूड केली जाई आणि नंतर ही पूड अमोनिया मध्ये टाकून पुन्हा उकळली जाई .लाल रंगाचे रंगद्रव्य गाळणे आणि नंतर तुरटी वापरून निःक्षेपीकरण या क्रियेने तयार केले  जाई . इंडिगो (Indigo) हे रंगद्रव्य इंडिगो या वनस्पतीपासून (शास्त्रीय  नाव इंडिगोफेरा टिंकटोरिया )  तयार केले  जात असे .या वनस्पतीची पाने पाण्यात  भिजवून  मिश्रण आंबवण्यात  येई आणि निळे रंगद्रव्य तयार केले  जाई .नंतर सोडियम हायड्रोक्साईड वापरून निःक्षेपिकरण केले जाई ; व शेवटी  वाळवून पूड केली जाई .केवळ १०० ग्रॅम रंगद्रव्य तयार करण्यासाठी ३७ चौ मी क्षेत्रावरील वनस्पतीचे पीक वापरावे लागत असे ;आणि म्हणूनच त्याला ‘निळे सोने ‘अशाही नावाने लोक संबोधू लागले.

१९०९ साली पॉल फ्रेडलेंडर (Paul Friedlander) यांनी टायरन जांभळा या रंगद्रव्याच्या रासायनिक संरचनेचा शोध लावला .( आता त्याचे रासायनिक नाव ६,६ डाय ब्रोमोइंडिगो)परंतु तो पर्यंत रंगद्रव्य उद्योगाचे स्वरूप आमूलाग्रपणे बदलले होते .आता रंगद्रव्ये कोळशाच्या निर्मिती प्रक्रीयेमधील दुय्यम उत्पादनापासून तयार करण्यास प्रारंभ झाला होता .यातील पहिले रंगद्रव्य माउविन (mauveine) ब्रिटीश रसायनतज्ञ विल्यम हेन्री पर्किन याने कोल टारपासून १८५६ साली तयार केले .ही सर्व रंगद्रव्ये स्वस्त तर होतीच परंतु यामध्ये रंगांच्या  पहिल्यापेक्षा अनेकविध रंगछटा  उपलब्ध होत्या ..या मुले नैसर्गिक रंगद्रव्यांची आवश्यकताच लोप पावली .आणि म्हणूनच आज आपण जे कपडे विकत घेतो त्याच्या किमतींचा त्याच्या रंगाशी कोणताही संबध उरलेला नाही.

अनुवाद:-श्री.विद्याधर शुक्ला

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा







Comments

Popular Posts