कुतूहल: केळीच्या सोपटय़ाचा धागा

बरीचशी वैद्यकीय व इतर महत्त्वाची रसायने किण्वन (फर्मेटेशन) क्रियेने बनवली जातात. प्रतिजीवके (एन्टीबॉडीज), संप्रेरके (हार्मोन्स) ही जीवाणूकृत किण्वन क्रियेने बनवली जाणारी महत्त्वाची रसायने. आपण जीवाणूंच्या पेशीमध्ये विकरांच्या (एन्झाइम्स) साहाय्याने कच्च्या मालाचे तयार मालात स्थित्यंतर घडवून आणत असतो. परंतु कित्येक वेळेस हे जीवाणू काही कालावधीत हे स्थित्यंतर घडवून आणण्याचे गुणधर्मही गमावून बसतात, तर कधी या जीवाणूवर काही विषाणू (व्हायरस) हल्ला करतात व त्यांना खाऊन टाकतात. यामुळे बरेच मोठे नुकसान होते.

        या सर्वावर शास्त्रज्ञांनी एक उपाय शोधला. त्यानुसार या जीवाणूंची विकरे वेगळी काढून ती प्लास्टिकच्या चाळणीवर किंवा नायलॉनच्या धाग्यावर स्थिरावून टाकतात. असे धागे कच्चा माल असलेल्या मोठमोठय़ा भांडय़ात सोडून आपल्याला अपेक्षित अशा रासायनिक प्रक्रिया घडवून आणू शकतात. तसेच हे धागे पुन्हा पुन्हा वापरता येतात. त्याहीपेक्षा अशी गटवार विभागांची प्रक्रिया करत बसण्यापेक्षा जर अशी एक नलिका तयार केली की जिच्यामध्ये विकर स्थिरावलेली चाळणी अथवा जाळे तयार असेल तर नलिकेच्या एका बाजूने कच्च्या मालाचा द्रव सोडला तर दुसऱ्या बाजूला आपल्याला हवे असलेले रसायन ताबडतोब मिळू शकेल. उदाहरणार्थ अमायालेज हे विकर पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर करते.

खादी उद्योगधंद्यात स्थर्य यावे म्हणून हातमागावर विणल्या जाणाऱ्या खादीत १० टक्के प्लास्टिकचे धागे वापरावेत, असा फतवा भारत सरकारने काढला. या मानवनिर्मित धाग्यांची किंमत कच्च्या मालाच्या तुटवडय़ाबरोबर वाढत जाणार आहे. यावर तोडगा म्हणून जर्मनीतील शास्त्रज्ञ केळीच्या सोपटय़ापासून मिळणाऱ्या धाग्यांचा उपयोग वस्त्राकरिता तसेच इतर क्षेत्रांतही करतात. केळीच्या सोपटय़ापासून मिळणाऱ्या धाग्यांपासून फरशा, चटया, दोर, कागद, पुठ्ठे तयार केले आहेत. तसेच आता ते कापूस, वेत व केळ्याच्या सोपटय़ाचे धागे यांचे मिश्रण इमारतीच्या तक्तपोशीकरिता वापरू लागले आहेत.
ल्ल अ. पां. देशपांडे  (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

Comments

Popular Posts