द रॉयल सोसायटी
#अनुवाद
द रॉयल सोसायटी
जर तुम्हाला एखादी चांगली कल्पना सुचली, तर तुम्ही ती कोणाला सांगाल? सुशिक्षित समाजात जेव्हा शास्त्रज्ञांना अशी एखादी कल्पना सुचते, तेव्हा ते इतर शास्त्रज्ञांना सांगतात. ही परंपरा ब्रिटनच्या रॉयल सोसायटीकडून सुरु झालेली आहे.
सुरुवात: अदृश्य महाविद्यालय.
१७ व्या शतकात जेव्हा युरोप हा त्यांच्या विचारांच्या क्रांतीच्या मार्गानं जात होता, त्याला ज्ञान माहितीचा काळ असंही म्हणता येईल. लोक त्यांचे निसर्ग आणि विश्व याबद्दलचे त्यांचे विचार कसे बदलवतात, हे फ्रांसिस बेकन, रेने डिस्कार्टेस, निकोलस कोपर्निकस आणि गॅलिलिओ गॅलिली यांच्या संशोधनाने, सिद्ध झाले.
रॉबर्ट बायल, ख्रिस्तोफर रिन, रॉबर्ट हुक आणि जॉन इव्हिलीन यांच्यासह बारा विद्वान, त्यांच्या दैनंदिन शास्त्रीय प्रगतीबद्दल व नवनवीन प्रयोगांबद्दल चर्चा करण्यासाठी नेहमी लंडनमध्ये भेटत असंत. त्यांच्या भेटीची कोणतीही ठराविक जागा नसल्याने, ते त्याच्या गटाला अदृश्य महाविद्यालय म्हणत. तोपर्यंत शास्त्रज्ञ एकट्यानंच काम करत. ते अदृश्य महाविद्यालयंच होतं जिथे त्यांनी त्यांचं संशोधन प्रथमत: जाहीर केलं.
रॉयल सोसायटीचे संस्थापक
सन १६६० मध्ये अदृश्य महाविद्यालयाच्या सदस्यांनी, औपचारिकरित्या त्यांची एक संस्था/मंडळ स्थापन करावयाचे ठरविले. २८ नोव्हेंबर रोजी, ग्रेशम महाविद्यालय येथे भेटून, त्यांनी भौतिकी-गणितीय प्रयोग शिक्षणास प्रोत्साहन देणाऱ्या महाविद्यालयाची स्थापना केली.
इंग्लंडचे राजे चार्ल्स द्वितीय यांनी १५ जुलै १६६२ रोजी, शाही सनदेद्वारे, राष्ट्रीय संस्था स्थापन करण्यास परवानगी दिली. तिचेच नामकरण 'दि रॉयल सोसायटी ऑफ लंडन, असे करण्यात आले. ते लवकरच वैज्ञानिक बाबींवरील चर्चेचे मुख्य अंग बनले तसेच शासनाचे सल्लागारही झाले.
लवकरच इतर देशांतही तत्सम संस्था स्थापन झाल्या. १६८७ मध्ये राजे लिओपोल्ड प्रथम यांनी जर्मन अँकॅडमी ऑफ सायन्स (लिओपोल्डीनिया या नावानेही परिचित) ला मान्यतेची सनद जाहीर केली. १७९५ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ फ्रान्सची स्थापना झाली. विज्ञानाच्या प्रगतीसाठी १८४० मध्ये अमेरिकन सोसायटीची स्थापना करण्यात आली.
ती १९३४ मध्ये सी.व्ही.रामन यांच्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या इंडीयन अँकॅडमी फॉर सायन्सेस( भारतीय विज्ञान अकादमी) या भारतीय संस्थेशी समतुल्य आहे.
यंत्रज्ञ (अभियंता) आर्देसर कर्सेटजी हे १८४१ मध्ये निवडून आलेले रॉयल सोसायटीचे पहीले भारतीय सदस्य आहेत. १९१८ मध्ये अगदी कमी वयात रॉयल सोसायटीच्या सदस्यपदी निवडून येणारी दुसरी भारतीय व्यक्ती म्हणजे गणितज्ञ एस. रामानुजन.
विद्यावंत संस्थांची भूमिका
बऱ्याच देशांमध्ये अग्रगण्य विद्यावंत संस्थां महत्वाची भूमिका बजावतात. त्या आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित करत असतात, जेथे आपण नवीन शास्त्रांबाबत चर्चा करु शकतो. त्या वैज्ञानिक समस्यांमध्ये सरकारच्या मुख्य सल्लागार असतात. सदर संस्था त्यांच्या नियतकालिक शोधपत्रिकांमध्ये शास्त्रज्ञानी लावलेले शोध प्रकाशित करतात. बऱ्याचदा या संस्था शास्त्रज्ञांना त्यांच्या प्रकल्पांसाठी आर्थिक अनुदान देत असतात तसेच विज्ञानाच्या अभ्यासाकरता विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मंजूर करत असतात.
अशा विद्यावंत संस्थांपैकी रॉयल सोसायटी ऑफ लंडन या संस्थेचा प्रतिष्ठीत संस्था म्हणून अजूनही जगभरात नावलौकीक आहे. या संस्थेचा सदस्य (ज्याला फेलो असे म्हणतात) होण्यासाठी, शास्त्रज्ञ म्हणून ख्यातनाम असणं तसेच कित्येक शोध सिद्ध झालेले असणं आवश्यक आहे. विद्यमान सदस्य तुमच्या सभासदत्वासाठी नामनिर्देशन करतात व इतर सभासद, तुम्हाला दाखल करुन घ्यायचं किंवा नाही यासाठी मतदानाने निर्णय घेतात. जगभरातील शास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक मिळण्याबद्दल मनात जेवढी इच्छा बाळगून असतात तेवढीच इच्छा त्यांच्या नावांपुढे एफ.आर.एस. (रॉयल सोसायटीचा सभासद) लागावं म्हणून बाळगून असतात.
द फिलॉसॉफीकल ट्रान्झॅक्शन्स
कित्येक वैज्ञानिक नियतकालिकांपैकी, रॉयल सोसायटीचे 'द फिलॉसॉफीकल ट्रांझॅक्शन्स' हे एक नियतकालिक प्रकाशित होत असते. ते ६ मार्च १६६५ पासून, सतत प्रकाशित होत असलेले, जगातील सर्वात जुने विज्ञानविषयक नियतकालिक आहे. तुम्ही सर्वात पहिल्या अंकाचे मुखपृष्ठ छायाचित्रात पाहू शकता. हे तेच नियतकालिक आहे ज्यामध्ये आयझॅक न्यूटन (न्यू थिअरी अबाऊट लाईट अँड कलर्स,१६७२) जोसेफ प्रिस्टले (ऑब्झर्व्हेशन्स ऑफ डिफरंट काईंड ऑफ एअर, १७७२) आणि जॉन डाल्टन (ऑन दि कॉन्स्टिट्यूशन ऑफ अँटमॉसफिअर, १८२६) यांचे त्यांमधील काही सर्वात प्रसिद्ध शोध प्रकाशित झालेले आहेत. तुम्ही नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी काही प्रसिद्ध शोधांबद्दल येथे वाचू शकता.
अनुवाद:-श्री.अमोल शिंपी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

Comments
Post a Comment